शेळी पालन हा व्यवसाय ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो. छोट्या शेतकऱ्यांसाठी तर शेतीच्या तुटपुंज्या उत्पन्नामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे शक्य नसते. अशावेळी अतिशय कमी गुंतवणुकी मध्ये पशुपालन हा एकमेव पर्याय त्यांच्यासमोर उपलब्ध असतो  शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात.ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरामध्ये शेळ्या पाहायला मिळतात. अतिशय कमी गुंतवणुकीमुळे सहसा लोक शेळी पालनाचा पर्याय निवडतात. सध्या पाहिल्यासारखं लोकांना माळरानांवर बकरी चारणे आणि संगोपन करणे शक्य होत नाहीय.

मी प्रमिलाताई नथ्थू पाटील, राहणार भालेर गाव, जिल्हा नंदुरबार, शेतकरी हा माझा व्यवसाय आहे. माझ्या घरी माझ्यासोबत माझे पती, मुलगा, त्याची पत्नी व माझे दोन नातवंडे राहतात. माझे घर पडलेले असून ते बांधण्यासाठी मी घरकुल योजनेमध्ये अर्ज सादर केलेला आहे. सध्या मी बाजूच्याच घरात भाड्याने वास्तव्यास आहे. बाहेरच्या शिवारात माझे स्वतःचे शेत असून विहिरीला अगदी कमी पाणी आहे. त्यामुळे जीवन जगण्याची व पोट भरण्याची तळमळ सुरू आहे. ना पिण्याचे पाण्याची सोय, ना चुलीचा ठिकाणा, ना धड झोपण्याची सोय, फक्त आणि फक्त ऊन, वारा व पाऊस यापासून संरक्षण मिळण्यासाठी छपरा खाली राहणे हीच काय ती  तूटपुंजी व्यवस्था. उदरनिर्वाहाचा प्रश्नच वेगळा. शेत आहे पण विहिरीला पाणी नाही, फक्त ईश्वराच्या कृपेने पाऊस चांगला झालाच तर एक पीक मिळणार, त्यावर कसेबसे संसाराचा गाडा हाकायचा. मुलगा पण सोबत शेती करतो, सून सुद्धा प्रयत्न करते, नातवंडे शाळेत जातात, कसाबसा संसाराचा गाडा हाकायचा. वेळेला औषधाला सुद्धा पैसे नसतात.
दोन वर्षांपूर्वी आलेल्या हृदय विकाराच्या झटक्यात कसेबसे बचावले. मुंबईला जाऊन बहिणीचा मुलगा सतीश पाटील यांनी साथ दिली. जणू दुसरा जन्मच मिळाला. नंतर गावाला परत आले, घर पडके आहे, घरकुल योजनेत नंबर लागत नाही, सरकार दरबारी फेऱ्या मारून हैराण झाले. त्यातच एक आशेचा किरण उगवला, शेळीपालनाचा धंदा करायचा. गरीबाची गाय पाळायची, उत्पन्नाचे खूप चांगले साधन आहे म्हणे. मला माहित होते परंतु दोन-चार शेळ्या पाडून धंदा होणार नव्हता. त्यातच माझ्या बहिणीच्या मुलाने सतीश पाटील यांनी देखील शेळी पालन हा धंदा करण्याविषयी इच्छा दर्शविली. त्याने शेळीपालन कसे करावे या विषयाचे व्यावसायिक प्रशिक्षण देखील घेतले. त्या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन व्यवसायाच्या मॉडेल आणि मार्केट रिसर्च, संपूर्ण चारा नियोजन, संपूर्ण खुराक नियोजन, शेड नियोजन व त्यातील बारकावे, पैदासीची शेळी खरेदी आणि नियोजन, बोकड खरेदी आणि नियोजन, दैनंदिन वेळापत्रक, प्रजनन चक्र, शेळीची प्रस्तुती नियोजन, करड्यांचे संगोपन आणि वाढ नियोजन, जंतू निर्मूलन आणि लसीकरण, आजार व उपचार, शेळ्यांचे टॉनिक आणि विशेष उपचार, लेंडी खत प्रक्रिया आणि नियोजन, बकरी ईद नियोजन, शेळीपालन मार्केटिंग तसेच शेळी पालन करताना करण्यात येणाऱ्या चुका, आरंभ व एक एकर मध्ये शेळीपालन कसे करावे अशा विषयावर विस्तृतपणे प्रशिक्षण घेतलेले आहे. आणि तसेच प्रशिक्षण मी सुद्धा घेतले आहे. स्वतः शेतकरी असल्यामुळे शेळीपालना विषयीचे ज्ञान मला होतेच, परंतु ते दोन-चार शेळी पुरते मर्यादित होते. प्रशिक्षणानंतर व मुलाच्या मार्गदर्शनानंतर असे जाणवले की आता 50 व त्याहून अधिक शेळ्यांचे व्यवस्थापन करू शकतो व त्या पाळू शकतो.
महाराष्ट्र सरकार शेळीपालनासाठी बिनव्याजी कर्ज देणार आहे व त्यासाठी मी अर्ज सादर केलेला असून लवकरच मला मदत मिळेल अशी आशा आहे.